राहुरी विद्यापीठ, दि. 17 जुलै, 2024
कोरोनाच्या अतिशय कठीण कालावधीमध्ये अथक परीश्रमातून कृषि विज्ञान संकुलाची सन २०२०-२१ साली सुरुवात करण्यात आली. संकुलाअंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे एकाच वेळी मान्यता मिळालेले देश पातळी वरील एकमेव संकुल आहे. मालेगाव व पंचक्रोशीच्या विकासासाठी हा अभिनव प्रकल्प आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांनी केले. कृषि विज्ञान संकुल काष्टी, मालेगाव येथे दि. १६ जुलै रोजी मा.ना. श्री. दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की कृषि विज्ञान संकुल हा प्रकल्प म्हणजे मालेगावची कृषि पंढरी म्हणून उदयास येत आहे. अतिशय दिव्य दृष्टीने साकारण्यात येणारा हा प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री.दादाजी भुसे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास येत आहे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी कृषि विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ.सचिन नांदगुडे यांनी कृषि विज्ञान संकुलामध्ये सुरु असलेल्या सर्व कामांचे सादरीकरण करत सद्यस्थितीच्या प्रगतीवर दृष्टीक्षेप टाकला. या बैठकीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, डॉ. एस.पी. सोनवणे व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.