
- कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील
राहुरी विद्यापीठ, दि. 12 एप्रिल, 2024
कृषि संशोधन केंद्र, वडगाव मावळ येथून भात पिकाचे इंद्रायणी, पवना, कुंडलिका, फुले मावळ, फुले समृद्धी व फुले कोलम असे सहा विविध वाण आजपर्यंत विकसित झाले आहेत तसेच या संशोधन केंद्राने 33 भात पीक उत्पादन विषयक शिफारशी दिलेल्या आहेत. या केंद्राने विकसीत केलेल्या या वाणांच्या व शिफारशींच्या वापरामुळे भात उत्पादक शेतकर्यांची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे. या भात संशोधन केंद्राने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्रातील भात पिकाची उत्पादकता वाढली असून हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
वडगाव मावळ, जि. पुणे येथील कृषि संशोधन केंद्रास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संशोधन केंद्रात होत असलेल्या विविध संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. नरेंद्र काशीद यांनी संशोधन केंद्रातील विद्यापीठीय व अखिल भारतीय समन्वित प्रकल्पातील विविध संशोधन प्रयोग, योजना, बीजोत्पादन व विस्तार कार्यक्रम याविषयी सादरीकरण केले. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी संशोधन केंद्र विकासासाठी मार्गदर्शन केले. यानंतर कुलगुरू डॉ. पी जी पाटील यांनी कृषि संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्राला भेट दिली व गहू पिकाची हार्वेस्टरने चालू असलेल्या कापणीची पाहणी केली. याप्रसंगी कृषि महाविद्यालय, पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, कृषि संशोधन केंद्राचे भात पैदासकार डॉ. तुकाराम भोर व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply