महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचार्यांचा उपोषणाविरोधात मुकमोर्चा

Posted by

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचार्यांचा उपोषणाविरोधात मुकमोर्चा
राहुरी विद्यापीठ, दि. 15 जुलै, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे यांनी दि. 10 जुलैपासून सुरु केलेल्या उपोषणाविरोधात विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत मोठ्या संख्येने मुकमोर्चा काढला व कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि उपकुलसचिव श्री. व्ही.टी. पाटील यांना उपोषणाविरोधात निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले की डॉ. डी. के. कांबळे यांनी विद्यापीठ प्रशासनाशी बोलणे झाल्यानंतर उपोषण मागे घेतलेले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांच्या सोबत सुद्धा प्रशासनाने बोलणी केलेली आहे. परंतु डॉ. अहिरे हे उपोषण मागे घेण्यास तयार नाही. महात्मा फुले कृषि विद्यापीठ ही संस्था राज्यात आणि देशात एक नावाजलेली संस्था असून मागील 56 वर्षांमध्ये शास्त्रज्ञांनी, अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी अहोरात्र कष्ट करून या संस्थेच्या नावलौकिकात भर टाकलेली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात कोणत्याही कुलगुरुंकडून मागासवर्गीय किंवा कोणत्याही एका समुदायावर कधीही अन्याय झालेला नाही. सध्या विद्यापीठाची परिस्थिती रिक्त पदांच्या बाबतीत अत्यंत गंभीर असताना सुद्धा कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य चोख करत आहेत. त्यांना तितकीच खंबीर साथ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी डॉ. मिलिंद अहिरे हे त्यांच्या वैयक्तिक प्रश्नाला सामाजिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असून मागासवर्गीय समुदायावरती कुलगुरू अन्याय करत असल्याचे चित्र तयार करत आहेत. यामुळे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनोबलावर परिणाम होत असून शिक्षण आणि संशोधनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. सदर अधिकार्यांचे हे कार्य निश्चितच विद्यापीठाच्या नावलौकिकाला बाधा पोहोचवणारे असून विद्यापीठातील सर्व कर्मचारी याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. डॉ. अहिरे यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी कुलगुरूंची बदनामी करून विद्यापीठाच्या हिताच्या विरुद्ध काम करत असल्यामुळे सदर अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
निवेदनाला उत्तर देताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की उपोषणाला बसलेले प्राध्यापक म्हणतात की मागासवर्गीयांवर अन्याय झाला आहे. परंतु विद्यापीठाच्या वरिष्ठ पदांवर 65% च्या वर अधिकारी मागासवर्गीय आहेत. विद्यापीठ प्रशासन कधीच कोणावर अन्याय करत नाही. परंतु उपोषणकर्त्याने मागासवर्गीय शब्द वापरल्यामुळे आम्हाला हा शब्द वापरावा लागत आहे. परंतु विद्यापीठ एक कुटुंब असून या कुटुंबात कोणताही जातीभेद केला जात नाही. मी येण्यापूर्वीच प्राध्यापक डॉ. डी. के. कांबळे यांच्यावर चौकशी समिती बसलेली होती. परंतु त्यांची चौकशीची फाईल बघता त्यांचा कोणताही दोष नसल्यामुळे त्यांना या चौकशीतून निर्दोष सोडण्यात आलेले आहे. डॉ. डी. के. कांबळे यांनी शुक्रवारीच त्यांचे उपोषण मागे घेतलेले आहे. तसेच डॉ. मिलिंद अहिरे यांचे असे म्हणणे होते की त्यांचा पदोन्नतीसाठीचा अर्ज हा पुढे कृषि परिषदेकडे पाठविलेला नाही. परंतु, विद्यापीठातील कोणत्याच प्राध्यापकाचा अर्ज हा कृषि परिषदेकडे तांत्रिक अडचणीमुळे पाठविलेला नाही. परंतु त्यांची तशीच मागणी असेल तर हे अर्ज या आठवड्यात कृषि परिषदेकडे पाठवण्यात येतील. परंतु डॉ. मिलिंद अहिरे हे समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती देऊन विद्यापीठाची बदनामी करत आहेत. हे थांबणे गरजेचे आहे.
यावेळी संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले विद्यापीठाच्या या 56 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी एक संघाने राहिले आहे. विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी शेतकर्यांसाठी व समाजासाठी प्रामाणिकपणे काम केलेले असून या अशा कृतीमुळे समाजात विद्यापीठाची बदनामी होत आहे. यावेळी कुलगुरूंना निवेदन देताना मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजू अमोलिक म्हणाले माझी या विद्यापीठात 32 वर्ष सेवा झाली असून आत्तापर्यंत या विद्यापीठात जातीवरून कोणावरही अन्याय झालेला नाही. उपोषणकर्त्या प्राध्यापकाने मागासवर्गीय संघटनेकडे कोणताही पत्रव्यवहार केलेला नसून मागासवर्गीय संघटना त्यांच्या या उपोषणाचा निषेध करत आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उपोषण न करता सामंजसाने आपली मागणी प्रशासनाकडे मांडून त्यावर तोडगा निघू शकतो. परंतु, जातीचा आधार घेऊन वैयक्तिक स्वार्थ साधने हे योग्य नाही.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, डॉ. आण्णासाहेब नवले, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. बी.टी. पाटील, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. विलास वाणी, डॉ. विक्रम कड, समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोळसे तसेच उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम यांनी उपोषणाचा निषेध केला व समन्वय संघ प्रशासनाच्या बाजुने असल्याचे नमुद केले. सर्व कर्मचार्यांनी उपोषणाचा निषेध केला व सर्व कर्मचारी हे प्रशासनासोबत असल्याचे ग्वाही कुलगुरू यांना दिली. या मुकमोर्चामध्ये विद्यापीठातील संचालकांपासून, अधिकारी, महिला कर्मचारी ते शिपाई व मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Tags

कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे राहुरी विद्यापीठ कृषि महाविद्यालय कृषी महाविद्यालय जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ डिजीटल तंत्रज्ञानावर डॉ. दिलीप पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सुनील गोरंटीवार ड्रोनचा उपयोग दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन रतनगड ट्रेकिंगचे भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. मिलिंद अहिरे यांची निवडराहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती मिटकॉन कन्सल्टन्सी राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादनराहुरी विद्यापीठ