डिजिटल तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर ठरणार
- संचालक डॉ. सी.आर. मेहता
राहुरी विद्यापीठ, दि. 27 मे, 2024
ड्रोन, रोबोटिक्स, इमेजिंग आणि आयओटी तंत्रज्ञानाचा भारतीय शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या या योजनेतील अनेक यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी व या विद्यापीठातील संशोधकांनी निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेतील शास्त्रज्ञ तसेच तंत्रज्ञ येथे भेट देतील. या योजनेत होणारे डिजिटल संशोधन शेतीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पाला डॉ. सी. आर. मेहता यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल टेक्नॉलॉजीचे सह-समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे,कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व अखिल भारतीय समन्वित कृषि यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. तुळशीदास बास्टेवाड उपस्थित होते. यावेळी आय. ओ. टी. तंत्रज्ञान, हायपरस्पेक्टरल इमेजिंग सिस्टीम, मल्टीस्पेक्टर इमेजेस, पोर्टेबल एनडीव्हीआय मीटर, ऑटो पीआयएस, रोबोटिक्स व ड्रोन्स लायब्ररी तसेच आयओटी पार्क यासंबंधीची माहिती डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, इंजि. तेजश्री नवले, डॉ. वैभव मालूंजकर व इंजि.गौरी आंधळे यांनी दिली. यावेळी काटेकोर शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पामध्ये झालेल्या संशोधनाबद्दलची माहिती डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत तसेच ओळख डॉ. मुकुंद शिंदे यांनी करून दिली. डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी आभार मानले. यावेळी प्रकल्पातील संशोधन सहयोगी उपस्थित होते.