हवामान बदलांविषयी परिषदेचे आयोजन निश्चीतच कौतुकास्पद

Posted by

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील

राहुरी विद्यापीठ, दि. 21 एप्रिल, 2024

हवामान बदलांविषयी परिषदेचे आयोजन निश्चीतच कौतुकास्पद
हवामान बदलांविषयी परिषदेचे आयोजन निश्चीतच कौतुकास्पद

हवामान बदलासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीमध्ये मानवी हस्तक्षेप हा महत्वाचा घटक आहे. ग्रीन हाऊस गॅसेसमधून तापमान वाढत आहे तसेच कार्बन डायऑक्साइड पीपीएम पातळीमध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे मानवी शरीरावर व जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. निसर्गचक्रात बदल होऊन अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतीमधील किड रोग साखळीवर परिणाम होत असून पूर्वीच्या कमी नुकसानकारक किडी ह्या आता अधिक नुकसानदायक झाल्या आहेत. तापमान वाढीचा मोठा परिणाम मधुमक्षिकांवर होत असून त्याचा दूरगामी परिणाम कृषि उत्पन्न व पर्यायाने मानवी जीवनावर होणार आहे. येणाऱ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करत येऊ घातलेली भितीदायक परिस्थिती नियोजनबद्ध पद्धतीने हाताळली गेली पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
राहुरी आणि ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय “ॲग्रोवन हवामान बदल परिषद” कृषि महाविद्यालय, पुणेच्या डॉ. शिरनामे सभागृहात पार पडली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ हवामानतज्ञ डॉ. रंजन केळकर, सकाळ समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पवार व दैनिक ॲग्रोवनचे संपादक श्री. आदिनाथ चव्हाण उपस्थित होते.

     यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषी  विद्यापीठाने या बाबतीत खूप अगोदरच प्रयत्न सुरू केले आहेत. अवर्षणग्रस्त वातावरणात टिकून राहतील अशा विविध पिकांच्या जवळपास सहाशे जाती व त्या अनुषंगाने तंत्रज्ञान विकसित केले आहे. देशी गाई संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुरू केला आहे. त्यामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. या संदर्भात विद्यापीठाने विविध नामवंत संस्थासोबत सामंजस्य करार केलेले आहेत, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

   ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रंजन केळकर आपल्या भाषणात म्हणाले की शास्त्रज्ञांनी शेतक-यांशी संवाद साधला पाहिजे. शेती व अध्यात्माची सांगड घालत त्यांनी मानवी शरीराला शेतीची उपमा दिली. अगदी यथोचित व वेळेवर या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सकाळ समुहाची प्रशंसा केली. देशात १२७ हवामान क्षेत्र असून त्यापैकी नऊ महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील ७५ वर्षात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

      यावेळी डॉ. प्रतापराव पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात या विषयावर संवाद साधताना सकाळ माध्यमाने तीन लाख वीस हजार शेतकऱ्यांपर्यंत शेती संदर्भातील माहिती चे मार्गदर्शन केल्याचे सांगितले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतक-याच्या जमिनीसाठी योग्य असणारे पीक व त्यानुसार आवश्यक सर्व गोष्टींची माहिती ॲपद्वारे देण्यात येईल अशा ॲपवर काम चालू असल्याचे त्यांनी  सांगितले. जीवनातील विविध कामे करत असताना त्याचा व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर असणारा आपला सहभाग याचा विचार आपण केला पाहिजे असे त्यांनी नमूद केले. कुठलेही मॉडेल हे आर्थिकदृष्टया परवडणारे आणि सहज उपलब्ध होऊन स्वीकारार्ह असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सकाळ माध्यम व सकाळ रिलीफ फंडच्या माध्यमातून ९०० गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याचे त्यांनी नमूद केले. 

श्री. आदिनाथ चव्हाण यांनी ॲग्रोवनच्या गेल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये ॲग्रोवनचे असलेल्या स्थानाचे दाखले देताना महाराष्ट्रातील पाच शेतकऱ्यांनी स्वतःच्या घराला ॲग्रोवन असे नाव दिल्याचे सांगितले. हवामान बदलाच्या प्रयत्नांमध्ये नुसती जागृती उपयोगी नाही तर कृती सुद्धा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तापमान ५० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले की वनस्पतींच्या फिजिओलॉजी मध्ये मोठा बदल होईल आणि त्याचे परिणाम यावर अभ्यास करणे आत्तापासूनच गरजेचे असल्याचे त्यांनी विशद केले. पावसाची अनियमितता, असमान वितरण, तापमानामध्ये होणारे बदल इत्यादीमुळे बदलत जाणारी पिकांची परिस्थिती अशा विविध कारणांनी उत्पादनात १९ टक्के घट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम कमी आर्थिक उत्पन्न वर्गावर होणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

     या परिषदेमध्ये हवामान बदल वर्तमान आणि भवितव्य, शेती आणि पशुवरील परिणाम आणि हवामान अनुकूल शेतीचे प्रारूप या विषयांवरील गटचर्चेत जलतज्ञ श्री. प्रदीप पुरंदरे, श्री. वैजनाथ घोंगडे, यशदाचे डॉ. सुमंत पांडे, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, नागपूर माफसू विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, महाधनचे श्री. नरेश देशमुख आणि बारामती कृषि विज्ञान केंद्राचे श्री. तुषार जाधव यांनी सहभाग घेतला. या गटचर्चेचे संवादक म्हणून ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक श्री. अमित गद्रे आणि कृषि महाविद्यालय, पुणेचे जल व्यवस्थापन तज्ञ डॉ. रविंद्र बनसोड यांनी काम पहिले. या प्रसंगी प्रतीकात्मक नदी जलपूजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे माजी सदस्य श्री. पाशा पटेल, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे उपस्थित होते.

डॉ. धिरज कणखरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारीवृंद, शेतकरी, हवामान क्षेत्रातील विविध तज्ञ आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

One response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *