मालती_बेडेकर यांचा स्मृतिदिन

Posted by

आज आज जुन्या काळातील मराठी लेखिका #मालती_बेडेकर यांचा स्मृतिदिन.
जन्म. १८ मार्च १९०५
मालतीबाई या माहेरच्या मूळ नाव बाळुताई खरे. मालती बेडेकर या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. ‘महिला सेवाग्राम’शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दु:खालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता ‘विभावती शिरुरकर’ या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं. अलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा ‘कळयांचे नि:श्वास’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. ‘हिंदोळयावर’, ‘विरलेले स्वप्न’, ‘बळी’, ‘जाई’, ‘शबरी’, या कादंबर्या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. ‘पारध’, ‘हिरा जो भंगला नाही’, ही नाटकं, ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि ‘स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन’ हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे. त्यांच्या ‘बळी’ ‘शबरी ‘ आणि ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्यांची गुजराथीत भाषांतरे झाली आहेत. मालती बेडेकर यांचे ७ मे २००१ साली निधन झाले. आपल्या समूहातर्फे मालती बेडेकर यांना अदारांजली

आज जुन्या काळातील मराठी लेखिका #दुर्गा_भागवत यांचा स्मृतिदिन.
जन्म. १० फेब्रुवारी १९१०
विद्यार्थिदशेत असताना दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. दुर्गाबाईंचे वडीलही शास्त्रज्ञ होते. दुर्गा भागवत यांनी ’अर्ली बुद्धिस्ट ज्यूरिसप्रूडन्स’ हा विषय घेऊन एम.ए. केले. त्यांनी संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक, लोकसाहित्य, कथा, चरित्र, संपादन, अनुवाद, बालसाहित्य, ललितगद्य असे विविधांगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुर्गाबाई विणकाम, भरतकाम उत्तम करायच्या आणि स्वयंपाकात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृती शोधून काढल्या आहेत. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दुर्गा भागवत यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. फ्रेंच, जर्मन, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आणीबाणीच्या काळात त्यांनी लेखन स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य याविषयी ठाम जाहीर भूमिका घेतली, आणि त्यासाठी तुरुंगवास भोगला. * दुर्गा भागवत* यांचे निधन ७ मे २००२ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे दुर्गा भागवत यांना आदरांजली.

संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३मालती_बेडेकर यांचा स्मृतिदिन