महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. आनंद सोळंके यांचा बंगलोर कृषि विद्यापीठात सन्मान

Posted by

राहुरी विद्यापीठ, दि. 7 मे, 2024
अखिल भारतीय बियाणे संशोधन संस्था, नवी दिल्ली व माऊ संस्था, उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकातील बंगलोर कृषि विद्यापीठात वार्षिक बियाणे आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभाग प्रमुख व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके यांना दर्जेदार बियाणे उत्पादनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या परिषदेचे बियाणे विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. डी. के. यादव व उत्तर प्रदेश येथील माऊ संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिंन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

डॉ. आनंद सोळंके यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठात 30 वर्षांपेक्षा जास्त काळ संशोधन, कृषि विस्तार व शिक्षण या कामांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. त्यांनी प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बियाणे विभागाच्या 200 एकरपेक्षा जास्त क्षेत्र लागवडीखाली आणले. त्यांच्या काळात 2000 पेक्षा जास्त अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात येऊन त्यांना मूलभूत बियाण्यांचा पुरवठा केला गेला.

यामुळे कृषि विद्यापीठाला लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला. विद्यापीठाचे बियाणे तंत्रज्ञान केवळ विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रापूरते मर्यादित न ठेवता ती राज्याच्या सर्व भागाबरोबरच नागालँड व आसाम राज्यातील शेतकर्यांपर्यंत सोयाबीनचे बियाणे पोहोचविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.

त्यांचे संपर्क शेतकरी राज्यभर असून त्यांच्या वैयक्तिक संपर्काचा उपयोग त्यांनी विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी व महसूल वाढीसाठी केला. डॉ. आनंद सोळंके यांनी जॉन डीअर कंपनीच्या माध्यमातून दहापेक्षा जास्त शेततळ्यांची निर्मिती मोफत केली असून त्यामुळे विद्यापीठाचे बरेच मोठे क्षेत्र बागायती होण्यास मदत झाली आहे.

डॉ. आनंद सोळंके यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील तसेच बियाणे विभागाचे बियाणे विभागातील त्यांचे सहकारी डॉ. विजय शेलार, डॉ. उदय काचोळे, डॉ. कैलास गागरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *