
- माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती
राहुरी विद्यापीठ, दि. 14 एप्रिल, 2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जातींचे उच्चाटन करण्यासाठी खुप प्रयत्न केले. त्यासाठी जातीयंतांचा लढा देखील उभारला. आज भारतात सात हजारांपेक्षा जास्त जातींची नोंद आहे, अनेक धर्म आहेत तरीही आपला भारत देश एकसंघ आहे याचे सर्व श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. सर्व समावेशक आणि सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी राज्यघटना ही जगातील अद्वितीय राज्यघटना असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब पवार सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. संजय अपरांती बोलत होते.- या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. याप्रसंगी कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महाविरसिंग चौहान व इंजि. अभिजीत पाटील उपस्थित होते.
डॉ. संजय अपरांती विद्यार्थ्यांना उद्देशुन पुढे म्हणाले की प्रशासनात जाणार्यांनी मी जे काही करेल ते समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहचेल याचा विचार केला पाहिजे. मी आजपर्यंत जे काही शिकलो त्याची अंमलबजावणी कृतीत कशी करता येईल हे ठरवले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. - अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले की राज्यघटना लिहीण्याचे फार मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. याचबरोबर त्यांनी भुमीहिन मजुर व सघन शेती या शेतीविषयक धोरणात बदल सुचविले. जास्त पुर येणार्या प्रदेशातील शेती वाचविण्यासाठी धरणे बांधली पाहिजेत असा दृष्टीकोन ठेवून दामोधरसारखे प्रकल्प बांधल्यामुळे उत्तर प्रदेश तसेच बिहार या राज्यांमधील पूर परिस्थिती आटोक्यात आली.
- डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे भारतातील समाज एकसंघ राहण्यात मोठी मदत झाली असल्याचे यावेळी ते म्हणाले.
कुलसचिव श्री. अरुण आनंदकर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाला पडलेले एक सुंदर स्वप्न होय. आपल्याकडे जे काही आहे ते लोकशाहीमुळे आहे. - आपल्याला जर सन्माननीय नागरीक म्हणुन जगायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच आपल्याला पुढे जावे लागेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. महाविरसिंग चौहान यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. विजू अमोलिक यांनी मानले तर सूत्रसंचालन कु. दिव्या साठे हिने केले.
- या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply