सेक्युरिटीचा सॅल्यूट

Posted by

Weekend Blog

              सेक्युरिटीचा सॅल्यूट

कोणत्याही संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये संस्थेची सुरक्षा हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा असते. आपल्या विद्यापीठात सुद्धा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा आहे. या सुरक्षा यंत्रणेतील सेक्युरिटी गार्ड्स विद्यापीठच्या गेटवर, प्रशासकीय बिल्डिंग समोर, पीजीआय बिल्डिंग, इंजीनियरिंग कॉलेज बिल्डिंग तसेच प्रक्षेत्रावर महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असतात. समोरच्यावर वचक बसेल असे या सेक्युरिटी गार्डसचे व्यक्तिमत्व असते आणि ते कायम अलर्ट पोझिशनमध्ये असल्यामुळे विद्यापीठात वावरताना नक्कीच एक शिस्त व सुरक्षितता जाणवते.

विद्यापीठात पदवीदान समारंभ, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या सारखे कार्यक्रम किंवा अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी च्या वेळी ही सेक्युरिटी यंत्रणा अधिकच अलर्ट असते. सेक्युरिटी गार्ड्स मध्ये एक प्रकारचा उत्साह दिसतो आणि निश्चितच त्यामुळे कार्यक्रमात शिस्त आणि सुरक्षितता जाणवते. आपण सर्वजण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात मग्न असताना ही सेक्युरिटी यंत्रणा आपल्या नकळत स्वतंत्ररीत्या त्यांचे कार्य चोख बजावत असते.

विद्यापीठातील सुरक्षे बरोबरच विद्यापीठातील अधिकाऱ्यांना सॅल्यूट देणे हा एक त्यांच्या ड्युटीचा भाग असावा. अधिकाऱ्यां प्रती निष्ठा व विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी मी सतत अलर्ट आहे असा मेसेज बहुतेक या सॅल्यूट मधून हे सेक्युरिटी गार्ड्स देत असावेत. महत्त्वाच्या ठिकाणी विद्यापीठाचे अधिकारी आल्यानंतर संबंधित सेक्युरिटी गार्डणे त्यांना सॅल्यूट देणे हा प्रोटोकाॅलचा भागच असेल.

प्रशासकीय बिल्डिंग समोर मात्र हे चित्र दिवसभर पहायला भेटते. कोणत्याही अधिकाऱ्याची गाडी आली की गाडीचा दरवाजा उघडणे व अधिकाऱ्याला कडक सॅल्यूट देणे हा सेक्युरीटी गार्डसचा नित्य कार्यक्रम. प्रशासकीय बिल्डिंग समोरील हे चित्र मागील बऱ्याच वर्षापासून मी पाहत आलो आणि आपल्याला हा मान कधी मिळेल हे कुतुहल मनात अधुन मधून जागं व्हायचं.

आणि शेवटी तो दिवस ऊजाडला. माझ्याकडे हेड, ईंटर फॅकल्टी डिपार्टमेंट आॅफ ईरीगेशन वाटर मॅनेजमेंटचा चार्ज आला आणि डिपार्टमेंटकडे बोलेरो असल्यामुळे मी कार्यालयीन वाहनाने प्रशासकीय ब्युल्डींगला जावू लागलो. आणि जो सॅल्यूट चा मान इतर अधिकाऱ्यांना मिळायचा तो मान मला पण मिळू लागला. सुरुवातीला छाती फुगल्यासारखी वाटायची आणि लाजल्यासारखे पण व्हायचे. पण प्रशासकीय बिल्डिंगला जाण्या येण्याचे प्रमाण वाढले आणि सेक्युरिटी चा सॅल्यूट अंगवळणी पडला.

दोन वर्षानंतर विद्यापिठात जागतीक बँकेचा कास्ट प्रकल्प आला आणि माझी कास्ट प्रकल्पात बदली झाली. कास्ट प्रोजेक्ट आल्यानंतर प्रशासकीय बिल्डिंगला रोज जाण्याची वेळ येऊ लागली. बहुतेक वेळा फाईल घेऊन जाणे किंवा झालेली फाईल घेऊन येणे अशी कामे असायची. कास्ट प्रोजेक्ट ला त्यावेळेस गाडी नव्हती परंतु कामाचा प्रेशर आणि अर्जन्सी खूप असायची त्यामुळे कोणाची तरी मोटरसायकल किंवा स्कुटी घेऊन मी घाईघाईत प्रशासकीय बिल्डिंगला जात असे. मोटर सायकल लावल्यानंतर सेक्युरिटी गार्ड जोरात शिट्टी वाजवायचा आणि ओरडायचा
“ओ तिथे गाडी लावू नका. पलीकडे लावा” त्याच्या आवाजात जरब असायची. जो गार्ड काही दिवसापुर्वी गाडीचा दरवाजा ऊघडून मला सॅल्युट मारायचा तोच गार्ड आता शिट्टी वाजवून आपल्यावर ओरडतो. खूप बोअर व्हायचं. मी नंतर प्रशासकीय बिल्डिंगला जाताना मोटरसायकल किंवा स्कुटी न्यायचे टाळून पायी जाणे पसंत करू लागलो. मग असे लक्षात आले की प्रशासकीय बिल्डिंगला पायी गेल्यानंतर सेक्युरिटी गार्ड आपल्याकडे पाहत सुद्धा नाही (गाडीतील अधिकाऱ्यांना मात्र कडक सॅल्यूट मारतो).

मी, डाॅ. व्ही एस पाटील आणि डाॅ. रवि आंधळे नेहमी बरोबरच लोणी वरून अपडाऊन करतो. बऱ्याच वेळा ड्रायव्हिंगला व्ही एस पाटील असतो व मी त्याच्या शेजारच्या सिटवर बसलेलो असतो. विद्यापीठाच्या गेटमधून गाडी आत येताना तेथील सेक्युरिटी गार्ड मला रोज सॅल्यूट मारायचा. एक दिवस सेक्युरिटीने सॅल्यूट दिल्यानंतर व्ही एस मला म्हणाला.
‘सर तुम्हाला एक सांगू का?”
‘बोल”
‘तो गार्ड तुम्हाला नाही मला सॅल्युट मारतो”
सेक्युरीटीच्या सॅल्युटवरुन आधीच मी बोअर झालेलो. व्ही एस ने आणखी जखमेवर मिठ चोळले. लोकं अज्ञानातील सुखात पण जगु देत नाही.

कास्ट प्रकल्पाची कामाची व्याप्ती वाढतच गेली आणि पाटील साहेब कुलगुरू म्हणून जॉईन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कास्ट प्रकल्पाची कामाची व्याप्ती पाहता यांना गाडीची गरज आहे. साहेबांनी लवकरच कास्ट प्रकल्पाला प्राधान्याने गाडीची व्यवस्था केली. त्यानंतर मग मी अधून मधून कार्यालयाचे वाहन घेऊन प्रशासकीय बिल्डिंगला जाऊ लागलो आणि पुन्हा सेक्युरीटीचा सॅल्युट मिळु लागला आणि मी मनातल्या मनात हसु लागलो.

एक दिवस मला अर्जंट प्रशासकीय बिल्डिंगला जायचे होते. मी ड्रायव्हरला इशारा केला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि मी घाईघाईत ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलो. गाडी चालू केल्यानंतर आमचा जुनिअर क्लर्क श्री काळे पळत आला आणि म्हणाला
“सर मला पण प्रशासकीय बिल्डिंगला पीएओ ऑफिसला जायचंय”
मी त्याला मागच्या सीटवर बसायला सांगितले. प्रशासकीय बिल्डिंगला गेल्यानंतर सेक्युरिटी गार्डने मागचा दरवाजा उघडला आणि आमचा ज्युनिअर क्लर्क श्री काळे याला कडक सॅल्यूट दिला. काळे खूपच लाजला आणि माझ्याकडे पाहण्याचे टाळू लागला. मी त्याला म्हटलं
“काळे तू आज साहेब आणि मी क्लर्क”
तो आणखीनच लाजला आणि माझी नजर चुकवू लागला.

कार्यालयीन वाहनामध्ये अधिकाऱ्याची बसण्याची एक फिक्स सीट असते. तिथे बसले तरच गाडीचा दरवाजा ऊघडून सेक्युरीटीचा सॅल्युट मिळतो याचे ज्ञान त्या दिवशी पहिल्यांदा झाले.

आयुष्यात सर्वत्र असे विनोदी प्रसंग घडत असतात. त्यामुळे विनोदाचा आनंद घेवून सेक्युरीटी गार्डच्या विद्यापिठातील योगदानासाठी आपण पण त्यांना एक सॅल्युट देवू या.

©मुकुंद शिंदे
३.५.२०२४